बाबर घराण्यातील ‘बाप्पां’ चे दसऱ्याला होते विसर्जन

बाबर घराण्यातील गणेश उत्सव

बाबर घराण्यातील गणेश उत्सव | खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील गार्डी येथील बाबर घराणे ऐतिहासिक घराणे असून या घराण्यातील लढवय्यांनी मराठेशाहीत मोठा पराक्रम गाजवला आहे. याच घराण्यात गणेश विसर्जनाची आगळीवेगळी आणि महाराष्ट्रात दुर्मिळ असणारी परंपरा आहे. या घराण्यात गणेश चतुर्थीला ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना स्थापना होते. मात्र, त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला न होता विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात या घराण्याच्या इतिहासासंबंधी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत.

मराठेशाहीच्या उदयकाली महाराष्ट्रात लढवय्या सरदारांची नामांकित घराणी उदयास आली. त्यांनी आपल्या पराक्रमाने मराठेशाहीत नावलौकिक मिळविला. सरदार बाबर घराणे हे यापैकींच एक. सोलापूर जिल्ह्यात आलेगांव, डोंगरगाव, सांगोला, मंगळवेढा या भागात बाबर घराणी आहेत. त्यापैकी एक घराणे शिवकाळापासून खानापूर तालुक्यात गार्डी येथे स्थायिक झाले आहे. सन 1718 मध्ये मायणीच्या घारगे देशमुखांसंदर्भातील एका न्यायनिवाड्याच्या कागदात गार्डीच्या नऱ्होजी बापाजी बाबर यांची साक्ष नोंदविल्याचा उल्लेख आहे.

बाबर घराण्यातील तीन पिढ्यातील शिलेदार

मिरज किल्ला आणि संपूर्ण प्रांत हा पटवर्धन सरदारांकडे सन 1762 सालपासून होता. कर्नाटकातील हैदर आणि टिपू, सावनूरचा नवाब या शत्रूंकडे लक्ष देण्याची जबाबदारी पटवर्धन सरदारांकडे होते. याच पटवर्धन सरदारांकडे गार्डीच्या बाबर घराण्याचे शिलेदार होते. पटवर्धन सरदारांच्या अधिपत्याखाली कर्नाटकात ज्या मोहीमा झाल्या, त्यामध्ये बाबर घराण्यातील तीन पिढ्यातील शिलेदारांनी सहभाग घेत पराक्रम गाजवला. या घराण्यातील बळवंतराव बाबर, सुलतानबा बाबर यांनी कर्नाटकातील काही लढ्यात सहभाग घेतल्याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आढळतात. टिपूचा बंडखोर सरदार धोंडजी वाघ याने 1794 मध्ये कर्नाटकातील मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशावर हल्ला चढवला. तेव्हा त्याचे पारिपत्य करण्यासाठी सांगलीचे संस्थानचे संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पारिपत्य करण्यासाठी फौज रवाना करण्यात आली. या फौजेत गार्डीच्या सुलतानबा बाबर हे आपल्या फौजेनिशी सहभागी होते. या लढाईत सुलतानबा बाबर यांच्या डाव्या पायास गोळी लागली. त्यामुळे पाय निकामी झाला. गोळीची विषबाधा होऊ नये म्हणून तो मांडीपासून कापण्यात आला. सुलतानबा गार्डीकर यांच्या या पराक्रमाचे स्मरण पटवर्धन सरदारांनी कायम ठेवले होते.

पुढे सहा ऑगस्ट 1847 रोजी सुलतानबा बाबर हे वृध्द होऊन गार्डीस वारले. त्यावेळी चिंतामणराव पटवर्धन यांना फार दुःख झाले. 26 ऑगस्ट 1847 च्या चिंतामणराव पटवर्धन यांच्या दैनंदिनीत याचा उल्लेख आला आहे. त्यात म्हटले आहे, ‘सुलतानबा बिन बळवंतराव बाबर गारडीकर हे आषाढ वद्य 11 शुक्रवार शके 1769 दिवशी गार्डीस मृत्यू पावले. त्याच्या अस्ति ठेवण्यास आज्ञा झाली आहे. फार दुःख खाशास झाले. माणूस मर्द चांगला होता.’ सुलतानबा यांच्यानंतर त्यांचे पुत्र हणमंतराव, गोविंदराव यांच्यावरही पटवर्धनांचा लोभ होता. सांगली संस्थान विलीन होईतोपर्यंत बाबर घराण्यातील व्यक्तिंचे पटवर्धनांशी स्नेहबंध टिकून होते.

श्री गणेशाचा उत्सव

या ऐतिहासिक बाबर घराण्यातील श्री गणेशाचा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. प्रतिवर्षी गणेश चतुर्थीला या घराण्यात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मात्र, श्रींचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला न होता, ते 35 दिवसांनी विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला होते. बाबर घराण्यातील अनेक व्यक्ति नोकरी व्यवसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. ते त्याठिकाणी गणेशाची स्थापना करतात. मात्र, त्याचे विसर्जन दसऱ्यालाच करतात.

दसऱ्याला गणेश विसर्जन करण्याची बाबर घराण्याची प्रथा संपूर्ण राज्यात आगळीवेगळी आहे. मराठेशाहीच्या काळात दसऱ्यानंतर सरदार घराणी लढाईसाठी बाहेर पडत. त्यामुळे लढाईत श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला, या हेतूने श्री गणेशाची मूर्ती दसऱ्यापर्यंत ठेवायची, 35 दिवस तिची आराधना करायची आणि तिच्याकडे लढाईत विजयाचा आशीर्वाद मागत दसऱ्याला ती विसर्जीत करायची अशी ही परंपरा होती. पुढे लढायांचे कारण राहिले नाही. मात्र, पूर्वजांनी सुरू केलेली प्रथा बाबर घराण्याच्या पुढच्या पिढयांनी तशीच सुरू ठेवली आहे. श्री गणेशाच्या विसर्जनाची ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा बाबर घराण्यात गेली 250 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. | बाबर घराण्यातील गणेश उत्सव |

वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणूक

बाबर घराण्यात दसऱ्याला होणाऱ्या श्रींची विसर्जन मिरवणूकही वैशिष्ट्यपूर्ण असते. गार्डी गावातील नाथाच्या देवळातील पालखी आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बाबर घराण्यातील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यावेळी गावातील कुंभार टोपली घेऊन येतो. त्यामध्ये श्रींची मूर्ती ठेवली जाते. ती कुंभार डोक्यावर घेतो. गावातील गुरव हा शिंग फुंकतो. तर होलार समाजातील लोक वाजंत्री वाजवतात. ही मिरवणूक गावाजवळील ओढ्यावर येते. तेथे श्रींचे विसर्जन केले जाते. © मानसिंगराव कुमठेकर, #मिरज 9405066065 #Miraj 

बाबर घराण्यातील गणेश उत्सव
(दैनिक तरूण भारत, १७ सप्टें.२०२१)
मानसिंग कुमठेकर   यांचे विविध विषयावरील Blog वाचण्यासाठी – Mansing Blog
Please check, Like, follow ModifierIN Facebook & Twitter
Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

‘पानिपत’ च्या रणसंग्रामात सांगलीतील वीरांचा पराक्रम

पानिपत येथे झालेल्या इतिहासप्रसिध्द लढाईचा आज स्मृतिदिन. ‘पानिपत’ च्या या जगप्रसिध्द लढाईत सांगली जिल्हयातील वीर योध्दयांनीही पराक्रम गाजविला होता. या संग्रामात कळंबी (ता. मिरज) आणि…

मिरज किल्ल्यातील ऐतिहासिक दिवाणखान्याला 250 वर्षे पूर्ण

मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या आणि मराठेकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या ऐतिहासिक दिवाणखान्याला यंदा 250 वर्षे पूर्ण होत आहे. प्रसिध्द सरदार गोपाळराव पटवर्धन यांनी ही इमारत…

सांगलीत हत्तीही खेळत रंगपंचमी

होळी पौर्णिमा ही विविध प्रातांत वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. सांगली आणि मिरज संस्थानात होळी, धुळवड, रंगपंचमी हे सलग येणारे तीन उत्सव वैशिष्टयपूर्ण रितीने साजरे…

मोडी लिपी जतनासाठी प्रयत्न करणारा मिशनरी

मराठेशाहीची राजलिपी असलेल्या मोडीच्या जतनासाठी रेव्ह. हेन्री जॉर्ज हॉवर्ड या अमेरिकेतून आलेल्या मिशनऱ्याने खूप प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर मोडी लिपीचा प्रचार-प्रसार केला. पत्रव्यवहार व अन्य…

सोन्याचे कमख्वाब ते रेशमाचे हीमरू मशरू

नीव्वळ सोन्याच्या धाग्यांपासून वीणकाम केले जाते ते कमख्वाब! आज कमख्वाब नामक कापड कुणीच तयार करीत नाही. सोन्याचे, रेशमाचे आणी अतीशय मुलायम अशा सुताचे धागे हातमागावर…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *

ModifierIN, Social Media with Modi Script & Many More Modification...... We would like to show you notifications for the latest news and updates.
Dismiss
Allow Notifications