मिरज किल्ल्यातील ऐतिहासिक दिवाणखान्याला 250 वर्षे पूर्ण

मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या आणि मराठेकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या ऐतिहासिक दिवाणखान्याला यंदा 250 वर्षे पूर्ण होत आहे. प्रसिध्द सरदार गोपाळराव पटवर्धन यांनी ही इमारत बांधवून घेतली. त्यामुळे त्यास ‘गोपाळरावांचा दिवाणखाना’ या नावाने ओळखले जाते. सध्या हा दिवाणखाना बंद असून त्याची पडझड होत आहे. या दिवाणखान्या बांधकामासंदर्भातील कागदपत्रे कुमठेकर संग्रहात आहेत. तत्कालीन अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा हा दिवाणखाना जतन करावा, अशी मागणी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे.

मिरज शहरातील भुईकोट किल्ला हा बहामनीकाळापासून बलाढय़ लष्करी केंद म्हणून प्रसिध्द आहे. सन 1739 मध्ये पहिल्यांचा हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.

सरदार पटवर्धनांचे किल्ल्यात वास्तव्य

सन 1739 ते 1754 पर्यंत हा किल्ला बाळोजी डुबल आणि शिवाजी डुबल यांच्या ताब्यात होता. त्यानंतर सन 1754 ते 1761 या काळात हा किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात होता. सन 1761-62 मध्ये हा किल्ला आणि त्याभोवतीचा प्रांत सरदार पटवर्धनांना सरंजामाच्या खर्चासाठी देण्यात आला. तेव्हापासून पटवर्धन सरदारांचे वास्तव्य मिरजेत झाले. पटवर्धन सरदार हे पेशवाईतले वजनदार सरदार होते. प्रामुख्याने कर्नाटक प्रांत सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

गोपाळरावांनी बांधला दिवाणखाना

सरदार पटवर्धन यांचे मिरजेत वास्तव्य झाल्यावर त्यांना राहण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजांसाठी इमारतींची गरज भासू लागली. गोविंद हरी पटवर्धन हे या संपूर्ण पटवर्धन सरदारांचे ज्येष्ठ सदस्य होते. ते मिरज किल्ल्यात राहून कामकाज करीत. त्यांचे भाऊ, मुले आणि पुतणे हे लष्करी कामकाज करीत. गोविंद हरींचा थोरला मुलगा गोपाळराव पटवर्धन हे पेशवाईतील मातब्बर सरदार होते. पेशवाईत जे ‘साडेतीन राव’ प्रसिध्द होते, त्यामध्ये गोपाळराव हे पहिले राव होत. पेशवाईतील प्रमुख लढायांत त्यांनी भाग घेतला. विशेषत हैदर आणि टिपू विरोधात झालेल्या लढायांत त्यांनी पराक्रम गाजविला. आपली सर्व कारकीर्द त्यांनी युध्दमैदानावरच घालविल्याचे दिसते. मिरज किल्ल्यात वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजासाठी मोठा दिवाणखाना बांधण्याची ठरविले. सन 1768 पासून या कामाला त्यांनी सुरूवात केली. या दिवाणखाना बांधकामाची अनेक कागदपत्रे मिरज इतिहास मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

गुजराथमधून कारागीर आणले

गोपाळराव पटवर्धन यांनी मिरज किल्ल्यात नमुनेदार दिवाणखाना बांधण्याचे ठरविले. त्यासाठी गुजरातमधून कारागीर बोलावले. मराठेकालीन वास्तूशैलीतील सुंदर असा दिवाणखाना त्यांनी बांधवून घेतला. दिवाणखान्यात उत्कृष्ठ असे नक्षीकाम लाकडावर केलेले आहे. लाकडी कमानी, नक्षीदार छत असलेली दोन मजली इमारत त्यांनी बांधवून घेतली.

युध्दभूमीवरूनही दिवाणखान्याकडे लक्ष

गोपाळराव पटवर्धन हे सतत कोणत्या ना कोणत्या युध्दातच असत. मात्र, एक सुंदर दिवाणाखाना मिरजेत उभा राहावा, यासाठी ते प्रयत्नशील होते. युध्दभूमीवर त्यांनी वडिल गोविंद हरि यांना पाठविलेल्या अनेक पत्रात त्यांनी दिवाणखान्याच्या कामाची चौकशी केलेली आढळते. दिवाणखान्यासमोर विविध फळ-फुलांची बाग करावी, असे त्यांनी पत्रातून सांगितले आहे. दिवाणखान्यात भिंतीवर मराठाकालीन चित्रशैलीतील सुंदर चित्रे रेखाटण्यात आली होता. दिवाणखान्याचे बहुतांशी काम सन 1771 साली पूर्ण झाले. मात्र, गोपाळरावांना या दिवाणाखान्यात बसण्याचे भाग मिळाले नाही. सन 1768 ते 1771 या काळात ते सातत्याने युध्दभूमीवर होते. सन 1771 च्या जानेवारी महिन्यात युध्दभूमीवर प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते मिरजेत आले. मात्र, तीन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेला हा दिवाणखाना म्हणूनच गोपाळरावांचा दिवाणखाना या नावाने ओळखला जातो.

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार

गोपाळरावांचा हा दिवाणखाना पेशवाईतील आणि संस्थानकाळातील अनेक प्रमुख घटनांचा साक्षीदार आहे. सन 1771 नंतर पेशवाईतल्या बहुतांशी सरदारांचे पाय या वास्तूला लागले आहेत. नाना फडणवीस, दुसरे बाजीराव पेशवे, यांच्यासह अनेक सरदार येथे येऊन गेले आहेत. संस्थानकाळात तर अनेक महत्त्वाचे कार्यक्रम, ब्रिटीश गर्व्हनरांच्या भेटी, देशभरातील विविध संस्थानीकांच्या भेटी या वास्तूला झाल्या आहेत. दरवर्षी विजयादशमीचा आणि संक्रांतीचा मोठा दरबार या वास्तूत भरत असे. संस्थानीकांचे राज्याभिषेक, लग्न, मुंजी यांचे मोठे शाही सोहळे या दिवाणखान्याने अनुभवले आहेत.

दिवाणखाना जतन करण्याची गरज

संस्थाने विलीन झाल्यानंतर या वास्तूत न्यायालय भरू लागले. तीन वर्षांपूर्वी न्यायालयाचे स्थलांतर करण्यात आले. मात्र, त्यानंतर ही वास्तू वापराविना पडून राहिली आहे. तिची पडझड होत आहे. यंदा या वास्तूला 250 वर्षे पूर्ण होत आहे. मराठेशाहीतील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा दिवाणखाना जतन व्हावा, येथे एखादे संग्रहालय व्हावे, अशी मागणी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. © मानसिंगराव कुमठेकर, मिरज 9405066065 

Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

‘पानिपत’ च्या रणसंग्रामात सांगलीतील वीरांचा पराक्रम

पानिपत येथे झालेल्या इतिहासप्रसिध्द लढाईचा आज स्मृतिदिन. ‘पानिपत’ च्या या जगप्रसिध्द लढाईत सांगली जिल्हयातील वीर योध्दयांनीही पराक्रम गाजविला होता. या संग्रामात कळंबी (ता. मिरज) आणि…

हरिपूरमध्ये दोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालं विष्णू मंदिर

हरिपूर येथील लागू कुटुंबियांच्या ऐतिहासिक विष्णू पंचायतन मंदिराचा आज 201 वा वर्धापन दिन आहे. सांगली संस्थानचे संस्थापक थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या भगिनी ताराक्का लागू…

सोन्याचे कमख्वाब ते रेशमाचे हीमरू मशरू

नीव्वळ सोन्याच्या धाग्यांपासून वीणकाम केले जाते ते कमख्वाब! आज कमख्वाब नामक कापड कुणीच तयार करीत नाही. सोन्याचे, रेशमाचे आणी अतीशय मुलायम अशा सुताचे धागे हातमागावर…

मिरजेतील ऐतिहासिक बारव जपायला हव्यात

मिरज शहर आणि परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या २५ हून अधिक ऐतिहासिक विहिरी, बारव असून हे जलस्त्रोत जपण्याची गरज निर्माण झाली आहे. यादव-अदिलशाहीकाळापासून ते संस्थानकाळापर्यंत…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सांगली-मिरजेशी ऋणानुबंध

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर या सावरकर बंधूचे सांगली-मिरज शहराशी घनिष्ट संबंध होते. बाबाराव सावरकरांचे काही वर्षे सांगलीत वास्तव्य होते. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *

ModifierIN, Social Media with Modi Script & Many More Modification...... We would like to show you notifications for the latest news and updates.
Dismiss
Allow Notifications