मिरजेत साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारले अंबाबाई मंदिर

मिरजेची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मालगांव वेशीतील अंबाबाई मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी अदिलशाही काळात झाली आहे. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराच्या दर्शनासाठी सांगली-मिरजेतील संस्थानिक सहकुटुंब हजेरी लावत असल्याचे उल्लेख आहेत. त्यासंबंधी कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

शहरातील मालगांव वेशीमध्ये असणारे अंबाबाई मंदिर देवीभक्तांचे श्रध्दास्थान आहे.

मंदिर उभारणी बाबत संशोधन

मालगांव वेशीमध्ये असणारे हे अंबाबाई मंदिर शिवकालात मिरज प्रांताचे तत्कालीन ठाकर-देशपांडे (चंदूरकर) यांनी देवीचा दृष्टांत झाल्यानंतर बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. मात्र, हे मंदिर नेमक्या कोणत्या काळात उभारले गेले याचा स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाही. मंदिरासंदर्भात माहिती देणाऱ्या ऐतिहासिक साधनांचीही वानवाच आहे. त्यामुळेच या मंदिराच्या उभारणीचा माग काढणे अवघड होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी यासंदर्भात अभ्यास सुरू केला. आणि मंदिरासंदर्भातील इतिहासाचे काही दुवे हाती लागले. त्यावरून या मंदिर बांधणीचा काल अदिलशाही काळातपर्यंत मागे नेता येतो.

सन 1703 च्या दानपत्रात उल्लेख

अंबाबाई मंदिराचा सर्वांत जुना उल्लेख सात मार्च 1703 रोजी दिलेल्या एका दानपत्रात आढळतो. शहरातील चौथाई-जोशी या शिवकालीन घराण्यात प्रसिध्द इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार यांना हे दानपत्र मिळाले होते. वेदमूर्ती रायेभट बिन बाळंभट जोशी यांना सिदो बाबाजी व रामजी महादेव यांनी अंबाबाईचे देवळाजवळ घराची जागा दान म्हणून दिली होती. या दानपत्रात दान दिलेल्या घराचे वर्णन करताना चतुःसीमा सांगितल्या आहेत. यामध्ये ‘दक्षणकडे देवजी अंबाजी अर्जुनवाडकर, पश्चमेस पारसनीसाचे आंगण आणि उत्तरेस आनंदरासी गुरव, अंबेचा पुजारी असा उल्लेख आहे. या उल्लेखावरून अंबाबाईचे मंदिर किमान 1703 पूर्वी बांधले गेले असले पाहिजे. याच दानपत्रात ‘पश्चमेला बहिरो जखरस पारसनीस यांची हद्द’ असल्याचा उल्लेख आहे. आजही या पारसनीसांचे वंशज अंबाबाई मंदिराजवळच वास्तव्यास आहेत. हे दानपत्र ज्यावेळी दिले तेव्हा मिरजेवर मोगलांची सत्ता होती.

मुदनशहाच्या जबानीत देवीचा उल्लेख

मालगांव वेशीतील देवीसंदर्भात एक उल्लेख भिलवडी येथील हजरत मदनशाह दर्ग्यासंबंधीच्या कागदपत्रांत आढळतो. 31 डिसेंबर 1824 रोजी मोहिदीनशा वलद इसकशा फकीर कमरबस्ते यांनी लिहून दिलेल्या जबानीमध्ये म्हटले आहे, ‘मुदनशा कमरबस्ते फुडे फिरत मिरजस गेले. तेथे गावचे बाहिर तल्यामध्ये देवीचे देऊल होते. त्यासमोर देवलाबाहीर दोन दिवस बसले. तिसरे दिवसी देवीची मुर्त गुप्त जाहली. नंतर गुरवांनी पाहून गावात जाऊन गावकरी आणि हाकीमास (अधिकाऱ्यास) सांगितले, जे देवीची मुर्त देवलात नाही. गावकरी व हकीम येऊन मुदनशा साहेबास विच्यारले की, या देवलातील देवीची मुर्त काय जाहली?, ती सांगणे. त्यास त्याणी विच्यारले, तुमचा हिंदूचा देव तुम्ही पाहून घ्यावा.

तळय़ातल्या देवीची गावात स्थापना

त्याजवरून सारे हिंदू मिलोन देवीस आराधून आरती धुपारती केली. परंतू देवी आपले आसनावर येईना, तेव्हा बावास अर्ज करून सांगितले, की देवी आम्हास दाखविली असता, देवीची स्थापना गावात करून ही जागा आपणास देऊ. नंतर बावांनी आणखी धुपारती करून दार झाकून उघडविले, तो देवी आपले आसनावर आहे, असा चेमतकार पाहून हाकीमानी व गावकरांनी देवीची स्थापना गावात केली.’ या जबानीत हाकीम म्हणजे अधिकारी पहावयास आले असा उल्लेख आहे. त्यावेळी चंदूरकर देशपांडे हेच मिरजेचे ‘देशपांडे’ म्हणजे अधिकारी होते. कदाचित तेच हा प्रकार पहावयास आले असावेत.

मालगाव वेशीबाहेरचे मंदिर

31 डिसेंबर 1824 रोजी याच कमरबस्ते घराण्यातील मिराशा वलद काशीमबाबा फकीर यांनी लिहून दिलेल्या करीन्या (हकीकती) मध्ये देवीच्या मूर्तीची हकीकत सांगताना ‘मालगांव वेशीबाहेर देवीचे देऊल होते’ असा उल्लेख आढळतो. वरील तारखेच्या दोन्ही हकीकतीवरून मालगांव वेशीबाहेरची ती देवी म्हणजेच सध्याची अंबाबाई असावी, असे अनुमान करता येते. सध्याही याच अंबाबाई मंदिराजवळ अगदी थोडय़ा अंतरावर वरील हकीकतीमध्ये उल्लेख केलेला मदनशाबावा कमरबस्ते यांचा तकीया आहे. सदर कमरबस्ते यांच्या उपलब्ध वंशावळीवरून सदर हकीकतीमध्ये उल्लेख केलेले मदनशाहाबावा हे उत्तर शिवकालात हयात असल्याचे दिसून येते.

उत्तर शिवकालात मंदिराची उभारणी

चौथाई-जोशी यांना सन 1703 मध्ये दिलेले दानपत्र आणि वरील कमरबस्ते दर्ग्याची हकीकत यावरून अंबाबाईचे मंदिर हे उत्तर शिवकालात म्हणजे सन 1650 ते 1703 च्या दरम्यान केव्हातरी बांधण्यात आले असावे. सन 1686 पर्यंत मिरजेत अदिलशाहाचा सत्ता होती. त्यानंतर मोगलांची सत्ता आली. उपलब्ध आख्यायिकेनुसार सदरचे अंबाबाई मंदिर चंदूरकर देशपांडे यांनी बांधले असल्यामुळे प्रारंभीच्या काळात या मंदिराचे स्वरूप खासगीच राहिले असले पाहिजे. सन 1755 साली मिरजेचे तत्कालीन किल्लेदार शिवाजी बल्लाळ जोशी (थोरल्या माधवराव पेशवे यांचे सासरे) यांच्या कारकीर्दीतील एका जमीन आकार झाडय़ात मिरज शहरातील तत्कालीन सर्व प्रमुख हिंदू-मुस्लीम देवस्थानांचा उल्लेख आहे. मात्र, त्यात अंबाबाई मंदिराचा उल्लेख आढळत नाही. हे मंदिर देशपांडे चंदूरकर यांचे खासगी असल्याने त्याचे नाव या यादीत आले नसावे. या मंदिराला शिवकालात किंवा पेशवाईत तत्कालीन राजकर्त्यांकडून इनामे दिल्याचे दिसत नाही. मात्र, शहरातील सांगली-मिरज रोडवर काही जमिनी अंबाबाई मंदिरासाठी इनाम दिल्या होत्या. त्या चंदूरकर देशपांडे यांनीच दिल्या असाव्यात. सध्या या जागेवर अंबिकानगर वसले आहे.

सांगली-मिरज संस्थानिकांची श्रध्दा

मिरज आणि सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचीही या मंदिरावर श्रध्दा होती. सांगली संस्थानचे संस्थापक आणि पेशवाईतील प्रसिध्द सरदार श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन हे नवरात्रीमध्ये या देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचे उल्लेख मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात असणाऱ्या चिंतामणरावांच्या दैनंदिनीत आहेत. प्रत्येक दिवाळीला तेलउटणे या मंदिराला संस्थानिकांकडून येत असल्याचे उल्लेखही आहेत. मिरजेचे संस्थानिकही या मंदिरात नवरात्रामध्ये सहकुटुंब दर्शनासाठी येत. देवीला खणओटी भरत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात असलेल्या सन 1840 मधील हिशोबात तत्कालीन संस्थानिकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची व देवीसमोर अडीच रूपये ठेवल्याची तसेच त्यांच्या पत्नीने खणाने ओटी भरल्याची नोंद आहे. इतिहासातील या विविध नोंदीवरून अंबाबाई मंदिराचे शहराच्या धार्मिक जीवनात काय स्थान होते? याची माहिती मिळते.

Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

मांजर्डेमध्ये आढळली चामुण्डा देवीची प्राचीन मूर्ती

मांजर्डे (ता. तासगांव) येथे महादेव मंदिरात चामुण्डा देवीची प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. या मूर्तीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर…

मिरजेत 140 वर्षांपूर्वी छापलं लसीकरणावरचं पहिलं मराठी पुस्तक

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सध्या मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे या लसीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, 140 वर्षांपूर्वी मिरजेत लसीकरणाची संपूर्ण माहिती देणारे मराठी भाषेतील…

सांगलीत हत्तीही खेळत रंगपंचमी

होळी पौर्णिमा ही विविध प्रातांत वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. सांगली आणि मिरज संस्थानात होळी, धुळवड, रंगपंचमी हे सलग येणारे तीन उत्सव वैशिष्टयपूर्ण रितीने साजरे…

बाबर घराण्यातील ‘बाप्पां’ चे दसऱ्याला होते विसर्जन

बाबर घराण्यातील गणेश उत्सव बाबर घराण्यातील गणेश उत्सव | खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील गार्डी येथील बाबर घराणे ऐतिहासिक घराणे असून या घराण्यातील लढवय्यांनी मराठेशाहीत मोठा…

इतिहास संशोधक शिकंदर अत्तार यांचे कार्य विस्मृतीत

विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात #इतिहास संशोधकांची मांदियाळी निर्माण झाली. यामध्ये #सांगली जिह्यातील भिलवडीच्या मिया शिकंदरलाल अत्तार यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *

ModifierIN, Social Media with Modi Script & Many More Modification...... We would like to show you notifications for the latest news and updates.
Dismiss
Allow Notifications