टाटांच्या पहिल्या विमान उड्डाणांची कागदपत्रे मिळाली

सुमारे 68 वर्षे सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडिया ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर जे.आर.डी. टाटांनी विमान वाहतूक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची चर्चा होऊ लागली आहे. टाटांनी सन १९३२ साली पहिले अधिकृत विमान उड्डाण केले असले तरी तत्पूर्वी १९३० साली बेंगलोर ते मुंबई अशी पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली होती. या चाचणी दरम्यान मार्च, १९३० मध्ये त्यांचे विमान बेळगांवच्या रेसकोर्स मैदानावर उतरले होते. या पहिल्या उड्डाण चाचणीचा गोपनीय अहवाल तत्कालीन मामलेदार आणि पोलीसांनी वरिष्ठांकडे पाठविला होता. मोडी लिपीतील हा अस्सल अहवाल मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाला आहे. भारतीय विमान वाहतूक इतिहासाचा हा अव्वल दस्तऐवज आहे.

भारत सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडिया ही सार्वजनिक विमान वाहतूक कंपनी सुमारे 18 हजार कोटी रुपयांच्या बोलीवर टाटा समुहाने विकत घेतली आहे. त्यामुळे सुमारे 68 वर्षानंतर ही कंपनी पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात आली आहे.

टाटा एअरलाईन्सची स्थापना

भारतीय उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने अढळस्थान मिळविलेल्या जेआरडी टाटा यांचे वैमानिक होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी ‘द रॉयल एरो क्लब ऑफ इंडिया ऍन्ड बर्मा’ या संस्थेचे सदस्यत्व मिळवून दहा फेब्रुवारी 1929 रोजी विमान चालविण्याचा परवाना मिळविला. त्यानंतर त्यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचे ठरवून 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून प्रारंभी टपाल सेवेला आरंभ झाला. टाटांनी भारतात सुरू केलेल्या या पहिल्या विमान सेवेने देशातील दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडवून आणली.

पहिले विमान उड्डाण

जेआरडी टाटांनी टाटा एअरलाईन्स कंपनीच्या माध्यमातून 15 ऑक्टोंबर 1932 रोजी कराची ते मुंबई असे पहिले विमान उड्डाण केले. 1946 साली या कंपनीचे रुपांतर एअर इंडिया कंपनीत झाले. तर 1953 साली या कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

विमान उड्डाणाची पहिली चाचणी

जेआरडी टाटा यांनी 1932 साली पहिली अधिकृत विमानसेवा सुरू केली असली तरी तत्पूर्वी या विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती. सन 1930 च्या मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात त्यांनी बेंगलोर ते मुंबई अशी विमान उड्डाण चाचणी घेतली. या चाचणी दरम्यान, त्यांनी बेळगांवमध्ये विमान उतरविले होते. बेळगांवमध्ये त्यांचा मुक्काम एक दिवस होता. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले होते. तत्कालीन पोलिसांनी बेळगांवच्या रेसकोर्स मैदानावर उतरलेल्या या पहिल्या विमानाबाबत दोन मार्च 1930 रोजी गोपनीय अहवाल लिहून ठेवला आहे. त्याची अस्सल प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे. भारतीय विमान सेवेच्या इतिहासाचा हा मौल्यवान ठेवा आहे.

काय म्हटलंय अहवालात?

तत्कालीन अनगोळ तालुक्याच्या मामलेदार आणि पोलिसांनी पाठविलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे की, ‘अजमासे आठ दिवसांपूर्वी मेसर्स टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीचे एक विमान बेंगळूरहून निघून अनगोळ वगैरे गावावरुन जावून बेळगांव रेसकोर्स ग्राऊंडवर उतरले होते. त्यांचा मुक्काम बेळगावास एक दिवस होता. आत फक्त एक युरोपीयन व एक पारसी असे दोन लोक होते. सदरचे वैमानिक फक्त ट्रायल करता आले होते. नंतर दुसऱ्या दिवशी विमान मुंबईकडे रवाना झाले’ या अहवालात उल्लेख केलेले पारसी व्यक्ती म्हणजे जे.आर.डी.टाटा होत. (प्रसिध्दी दै. तरूण भारत ११ ऑक्टो. २१)©मानसिंगराव कुमठेकर,9405066065

Recommended1 recommendationPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

मिरजेत 85 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश मिरवणूकीला प्रारंभ

| सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक | मिरज गणेशोत्सवात दीर्घकाळ चालणारी मिरजेतील श्रींची विसर्जन मिरवणूक ही दक्षिण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. शहरातील सर्व मंडळे एकत्रित येऊन एकाच…

सांगलीत हत्तीही खेळत रंगपंचमी

होळी पौर्णिमा ही विविध प्रातांत वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. सांगली आणि मिरज संस्थानात होळी, धुळवड, रंगपंचमी हे सलग येणारे तीन उत्सव वैशिष्टयपूर्ण रितीने साजरे…

छ.शिवरायांच्या बेळगांव स्वारीची कागदपत्रे उजेडात

छत्रपती शिवरायांनी सन १६७३ च्या सुमारास बेळगांववर स्वारी केल्याचा उल्लेख असलेला ऐतिहासिक कागद उजेडात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना हा…

मिरजेच्या स्पेलिंगचा मनोरंजक इतिहास

मिरजेच्या नावाला जसा एक हजार वर्षांचा मनोरंजक इतिहास आहे तसाच तो मिरज शहराच्या स्पेलिंगलाही आहे. परकीय प्रवासी आणि अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर त्यांनी मिरजेची विविध स्पेलिंग बनवली.…

मिरजेत साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारले अंबाबाई मंदिर

मिरजेची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मालगांव वेशीतील अंबाबाई मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी अदिलशाही काळात झाली आहे. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराच्या दर्शनासाठी सांगली-मिरजेतील संस्थानिक सहकुटुंब…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *

ModifierIN, Social Media with Modi Script & Many More Modification...... We would like to show you notifications for the latest news and updates.
Dismiss
Allow Notifications