छत्रपती शिवरायांच्या वाळवा भेटीला 361 वर्षे पूर्ण 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगली जिल्हय़ातील वाळवे गावाला 17 डिसेंबर 1659 रोजी भेट दिली होती. शिवरायांच्या या ऐतिहासिक भेटीला 361 वर्षे पूर्ण होत आहेत. वाळवे येथील इतिहासप्रसिध्द उमराणी घराण्यात मिळालेल्या एका ऐतिहासिक टिपणात अफझलखानावधानंतर घडलेल्या घटना देताना शिवाजी महाराज हे पौष शुध्द 14 शके 1581, शनिवारी वाळव्यात आल्याची नोंद केली आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वाळवा गावात मिरज इतिहास मंडळामार्फत शिवरायांच्या या भेटीच्या स्मृति जागविण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगली जिह्याशी घनिष्ठ संबंध होते. जिह्यातील भुपाळगड, मच्छींद्रगड आणि प्रचितगड हे तीन किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. मिरजेच्या किल्ल्याला शिवरायांनी घातलेला वेढा हा इतिहासप्रसिध्द आहे. सध्याच्या सांगली जिह्यातील बहुतांशी भाग हा आदिलशहाकडे होता. तो ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वारंवार प्रयत्न केल्याचे आढळून येते. छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत जतन करून ठेवण्यात आली होती. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे सांगली जिह्याशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंध आले होते.

शिवरायांची मिरज स्वारी

या तीन किल्ल्याबरोबरच मिरज येथील प्रसिध्द असा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी केलेली स्वारी ही इतिहास प्रसिध्द आहे. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स. 1660 मध्ये मिरजेत आले होते. 1659 च्या नोव्हेंबर महिन्यात अफजखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या फौजा विजापूरची अदिलशाही पादाक्रांत करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकून घेतली. शिवचरित्राचे अस्सल साधन मानले गेलेल्या ‘शिवभारता’ मध्ये या गावांची नावे दिली आहेत. यामध्ये सध्याच्या कराड, वाळवा, तासगांव आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.

शिवभारतात वाळवा घेतल्याची नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखान वधानंतर दक्षिण महाराष्ट्रील गावे जिंकून घेण्यासाठी या भागात स्वाऱ्या केल्या. ‘शिवभारत’ मध्ये या भागातील 23 गावांची नोंद आहे. यामध्ये खटाव, मायणी, रामापूर, कलेढोण, वाळवे, अष्टे, नेरले, कामेरी, विसापूर, उरण, कोळे यंसह अन्य गावांचा उल्लेख आहे. शिवभारतात नोंदविलेल्या या घटनांना पुष्टी देणारे एक ऐतिहासिक टिपण वाळवे येथील विष्णू उमराणी यांच्या घराण्यातील कागदपत्रांत मिळाले होते. सन 1926 साली भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका त्रैमासिकात ते प्रसिध्द करण्यात आले.

वाळव्यातील ऐतिहासिक टिपण

वाळवा येथील उमराणी घराण्यातील ऐतिहासिक टिपण हे अफजखान वधानंतर शिवरायांनी केलेल्या हालचालींची माहिती देणारे अस्सल टिपण आहे. उमराणी घराणे हे ऐतिहासिक घराणे असून त्यांच्याकडे वाळवे येथील ग्रामोपाध्येपणाचे वतन होते. या घराण्यात अदिलशाही काळापासूनची शेकडो कागदपत्रे होती. या घराण्यात अनेक सनदा, महजर, ऐतिहासिक पत्र्यव्यहार, ज्योतिषविषयक हस्तलिखीते, जुन्या कुंडल्या, टिपणे अशी कागदपत्रे असल्याची नोंद भिलवडीचे सुपुत्र आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक मिया शिकंदरलाल आत्तार यांनी करून ठेवली आहे. याच ऐतिहासिक उमराणी घराण्यात एक टिपण मिळाले. बाळबोध लिपीत हे टिपण असून त्यामध्ये अफझलखानाची स्वारी आणि त्याचा वध झाल्यानंतर कोणत्या घटना घडल्या, याची माहिती मिळते. अफझलखानाच्या स्वारीमुळे तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर येथील मूर्ती काढल्या होत्या. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यास मारले आणि पन्हाळा घेतला. अशा प्रमुख नोंदी केल्या आहेत. अफजखान वधानंतरच्या शिवरायांच्या हालचाली अभ्यासण्यासाठी वाळव्यातील हे टिपण अत्यंत उपयुक्त आहे.

वाळव्यात शिवरायांचा मुक्काम

उमराणी घराण्यात मिळालेल्या या ऐतिहासिक टिपणात शिवराय वाळव्यात आल्याची नोंद आहे. शिवरायांनी अफजखानानास मारल्यानंतर मार्गशीर्ष वद्य 7 रोजी पन्हाळा किल्ला घेतला. त्यानंतर ‘शाजिचा लेके पातशाय अस्ता सिंहस्त बृहस्पति आला होता पुष्य शुध चतुर्दशी 14 शनिवारी वाळव्यास शिवाजी भोसला’ असा उल्लेख आहे. म्हणजेच शिवाजी महाराज हे 17 डिसेंबर 1659 रोजी वाळवे गावी आले होते, याचा हा अस्सल पुरावा आहे.

छत्रपती शिवरायांनी वाळवा गावात दिलेल्या भेटीला यंदा 361 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवर छत्रपती शिवाजी महाराज हे सांगली जिल्हय़ातील मिरज येथेच आल्याचे मानले जात होते. मात्र, वाळव्यातील या टिपणावरून ते वाळवा गावीही आले होते, हे स्पष्ट होते. वाळवा गावाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने वाळव्याची भूमी पावन झाली आहे. शिवरायांच्या या वाळवा भेटीच्या स्मृती मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने जागविण्यात येणार आहेत.

वाळव्याला ऐतिहासिक वारसा

वाळवा गावाला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन व्यापारी मार्गावरचे हे गाव आहे. या गावात जुन्या इतिहासाच्या पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात सापडतात. वाळव्याला भुईकोट होता. या कोटाच्या दुरूस्तीचे काम सन 1752 मध्ये सुरू असल्याची नोंद आहे. या गावात ढाल, तलवार, वाघनखे, तोफांचे गोळे, लहान तोफा यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे मिळाली होती. बहामनी, अदिलशाही आणि मुघलकालीन नाणीही या गावात मिळाली आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक मिया शिंकदरलाल अत्तार यांनी यापैकी काही वस्तू मंडळाला दिल्या होत्या. ©मानसिंगराव कुमठेकर 9405066065 #Miraj

मानसिंग कुमठेकर     यांचे विविध विषयावरील Blog वाचण्यासाठी – Mansing Blog
Please check, Like, follow ModifierIN Facebook & Twitter 

Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER

share

Related Articles

इतिहास संशोधक शिकंदर अत्तार यांचे कार्य विस्मृतीत

विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात #इतिहास संशोधकांची मांदियाळी निर्माण झाली. यामध्ये #सांगली जिह्यातील भिलवडीच्या मिया शिकंदरलाल अत्तार यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक…

छ.शिवरायांच्या बेळगांव स्वारीची कागदपत्रे उजेडात

छत्रपती शिवरायांनी सन १६७३ च्या सुमारास बेळगांववर स्वारी केल्याचा उल्लेख असलेला ऐतिहासिक कागद उजेडात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना हा…

वासुदेवशास्त्री खरेंच्या घरात मिळाला ऐतिहासिक खजिना

थोर इतिहास संशोधक, व्युत्पन्न कवी, प्रसिध्द नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या घरी शास्त्रीबुवांच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रे, नामवंत लेखक-इतिहास संशोधकांचा पत्रव्यवहार, शास्त्रीबुवांनी ऐतिहासिक लेखसंग्रह व अन्य पुस्तकांसाठी…

सांगलीच्या प्राचीन इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक

सांगली जिल्ह्याच्या प्राचीन राजवटी आणि तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर प्रकाश टाकणारे नवे शिलालेख गेल्या दोन वर्षात मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना आढळून आले आहेत.…

‘पानिपत’ च्या रणसंग्रामात सांगलीतील वीरांचा पराक्रम

पानिपत येथे झालेल्या इतिहासप्रसिध्द लढाईचा आज स्मृतिदिन. ‘पानिपत’ च्या या जगप्रसिध्द लढाईत सांगली जिल्हयातील वीर योध्दयांनीही पराक्रम गाजविला होता. या संग्रामात कळंबी (ता. मिरज) आणि…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *