मिरजेच्या संगीत महोत्सवांचे ‘सीमोल्लंघन’

‘संगीत पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरज शहरात शंभर वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या संगीत सभांचे आयोजन केले जाते. नामवंत कलाकारांचे सादरीकरण आणि नेटके संयोजन यामुळे येथील संगीत कार्यक्रमांना रसिकांची पसंती असते. शहरात वर्षभर यशस्वीपणे संगीत सभांचे संयोजन करणाऱ्या संयोजकांनी आता सीमोल्लंघन केले असून त्यांच्याकडून परराज्यातही संगीत महोत्सवांचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांत इथल्या संगीतसभांच्या संयोजकांनी तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह महाराष्ट्राच्या विविध शहरांत जगभरातील नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मिरजेतील संगीतसभा संयोजकांच्या या प्रयत्नांना संगीत रसिकांनीही भरभरून दाद दिली आहे.

संगीत पंढरी मिरज

मिरज ही संगीतशारदेचा वरदहस्त लाभलेली नगरी आहे. महादेवबुवा गोखले, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलूसकर, प्रो. बी. आर. देवधर, विनायकबुवा पटवर्धन, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, हिराबाई बडोदेकर असे महान कलाकार या नगरीशी निगडीत आहेत. मिरज नगरी ही किराणा घराण्याचे अध्वर्यु गायक संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ यांच्या 40 वर्षांच्या वास्तव्याने आणि सुरांनी न्हाऊन निघालेली नगरी. तंतुवाद्याचे माहेरघर अशीही या नगरीची जगभर ओळख. संगीत इथल्या कणाकणात रूजलंय. इथल्या जमिनीला कान लावले तरी सतारीचे झंकार ऐकू येतील आणि इथलं मूल रडलं तरी ते सूरातच रडेल, अशी या भूमीची ख्याती.

संगीत महोत्सवांनी गजबजते वर्ष

याच संगीतपंढरीत शंभर वर्षांहून अधिक काळ दरवर्षी विविध प्रसंगानिमित्त संगीत सभांचे आयोजन करण्यात येते. मिरासाहेब उरूसानिमित्त तीन दिवस होणारा संगीतरत्न अब्दूल करीम खाँ महोत्सव, अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात होणारा नवरात्र संगीत महोत्सव हे तर देशभर प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त प्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष, ख्यातनाम गायक विनायकबुवा पटवर्धन, ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते उमरसाहेब मिरजकर, आबासाहेब सतारमकेर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानूदासबुवा गुरव यांच्या स्मृतिदिनी शहरात संगीतसभांचे आयोजन करण्यात येते. यासाठी दिग्गज गायक-वादक कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. वर्षभर होणाऱ्या या संगीतसभा रसिकांनी मेजवानीच असतात.

संगीत सभांचे नेटके संयोजन

या सर्वच संगीत सभांच्या संयोजनात इथल्या तंतुवाद्य कारागिरांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या एका शब्दावर नामवंत कलाकार इथे येत असतात. संगीत सभांच्या संयोजनाचा अनेक वर्षांचा अनुभव या सतारमेकर व्यावसायिकांच्या पाठिशी आहे. मिरजेत यशस्वीरित्या होणाऱ्या या संगीत सभा पाहून अन्य राज्यातील संगीतप्रेमींनीही त्यांच्याकडे अशा संगीतसभा आयोजित करण्याच्या सूचना या सतारमेकर व्यावसायिकांना केल्या. त्यानुसार येथील संगीत सभेचे ज्येष्ठ संयोजक मजिद सतारमेकर, नौशाद सतारमेकर आणि नईम सतारमेकर यांनी संगीतसभा आयोजनाच्या मिरजेतील अनुभवाचा उपयोग करीत तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह महाराष्ट्रातील अन्य प्रमुख शहरात स्थानिक संगीतप्रेमींच्या मदतीने संगीत सभा आयोजित केल्या.

नामवंत कलाकारांचे कार्यक्रम

गेल्या चार वर्षांत ख्यातनाम बासरीवादक रोनू मुझुमदार, रूद्रवीणावादक बहाऊद्दीन डागर, सतारवादक रईसखान, प्रसिध्द सतारवादक मनू श्रीवास्तव (अमेरिका), तबलावादक नयन घोष, सतारवादक महेताब नियाझी (दिल्ली), व्हायोलियनवादक राजस-तेजस उपाध्याय यांसारख्या दिग्गजांचे कार्यक्रम चेन्नई, कोईमतूर, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, बेंगलोर, कोल्हापूर येथे घेतले आहे. मिरजेतील संगीतसभा संयोजकांनी परराज्यात जाऊन तेथील रसिकांसाठी आयोजित केलेले हे कार्यक्रम तेथील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरले आहेत.

सतारमेकर व्यावसायिकांकडून यशस्वी संयोजन

गेली चार वर्षे ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर, नईम नौशाद सतारमेकर हे परराज्यात जाऊन तेथे दिमाखदार संगीत सभांचे आयोजन करीत आहेत. त्यांनी केलेले मिरजेतील संगीतसभांचे सीमोल्लंघन हे संगीतपंढरी मिरजेसाठी गौरवास्पद आहे. संगीत सभांच्या या सीमोल्लंघनासाठी मैनुद्दीन सतारमेकर, हारूण सतारमेकर, आतिक सतारमेकर, राज सतारमेकर, आरबाज सतारमेकर यांची यशस्वी साथ मिळत आहे. यापुढे परराज्यातील संगीतप्रेमींच्या मागणीनुसार दरवर्षी देशातील एखाद्या मोठ्या शहरी ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सारखा मोठा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे नईम सतारमेकर यांनी सांगितले. ©मानसिंगराव कुमठेकर 9405066065

मानसिंग कुमठेकर   यांचे विविध विषयावरील Blog वाचण्यासाठी – Mansing Blog
Please check, Like, follow ModifierIN Facebook & Twitter
Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

‘संगीतपंढरी’ मिरजेत सदनिकांनाही शास्त्रीय रागांची नांवे

ज्या भुमीला संगीत कलेचा शेकडो वर्षांचा वारसा आहे, ज्या भुमीत विविध घराण्यांच्या ख्यातनाम गायक-वादकांनी मनोभावे संगीतशारदेची सेवा केली, त्या संगीतपंढरी मिरजेत विविध सदनिकांना शास्त्रीय रागांची…

मिरजेत साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारले अंबाबाई मंदिर

मिरजेची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मालगांव वेशीतील अंबाबाई मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी अदिलशाही काळात झाली आहे. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराच्या दर्शनासाठी सांगली-मिरजेतील संस्थानिक सहकुटुंब…

नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी वापरलेले हार्मोनियम मिरजेत

नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी वापरलेले सुमारे ७० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ हार्मोनियम वाद्य मिरजेतील युवा तंतूवाद्य निर्माते नईम सतारमेकर यांनी पुण्यातील एका संगीत रसिकाकडून विकत घेतले आहे. प्रत्यक्ष बालगंधर्वांची…

मिरजेच्या सतारीवर विश्वविक्रमी झंकार

मिरजेतील भारतीय तंतुवाद्य केंद्राचे युवा तंतुवाद्यनिर्माते नईम सतारमेकर यांनी तयार केलेल्या सतारीवर दिल्लीचे संगीतशिक्षक राजकुमार यांनी तब्बल 33 तास 34 मिनीटे सलग सतारवादन करीत जागतिक…

म्हैसाळच्या शेतात रमले दिलीपकुमार

ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीपकुमार यांचे मिरज आणि परिसराशी घनिष्ठ संबंध होते. मिरजेचे प्रसिध्द सिनेछायात्रिकार व्ही. बाबासाहेब, म्हैसाळचे सहकारमहर्षि आबासाहेब शिंदे यांच्याबरोबर असणारे दिलीपकुमार यांचे मैत्र तर…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *